loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, April 1, 2013

कसबा गणपती- Kasba Ganpati, Pune March 2013

कसबा गणपती. केवळ नाव घेतले तरी चटकन ध्यानी येते ते पुण्याचे ग्रामदैवत , मनाचे १ले गणपती. पुण्यातील सर्वात जुने , अत्यंत ज्वलंत ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे हे श्रींचे अधिष्ठान. अगदी पुण्याची पुनवडी होती तेव्हापासूनचे सार्यांचे लाडके दैवत. आजवर सापडलेल्या अनेक शिवकालीन खत-खलिद्यात तब्बल ७०० वर्षांपूर्वीचे देखील कसबा गणपतीचे "श्री मोरया" या नावाने उल्लेख सापडले आहेत. म्हणजे यादव काळापासून पुणे हे महाराष्ट्रातील कदाचित पहिले गाव असेल , जेथे श्रीं गणेशाचे वास्तव्य आढळून येते.
       मुळा -मुठेच्या संगमावर वसलेले हे देऊळ , पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या समोर अगदी हातभर अंतरावर. पूर्वीपासून पुण्यातील सर्वात जुनी रहिवासी वस्ती म्हणजे पेठ असणार्या कसबा पेठेत.शिवाजी महाराजांच्या घराकडून; म्हणजे आजही मोठ्या दिमाखाने उभ्या असलेल्या लाल महालाच्या फक्त डाव्या हाताला ही वाडा-सदृश्य , ऐस-पैस वास्तू तितक्याच डौलाने उभी असलेली दिसते.या मंदिरावर यादवकालीन आणि हेमाडपंती अशा दोन्ही शैलींचा छाप दिसून येतो. महाराष्ट्रात अकरा ते चौदाव्या शतकापर्यंत  "हेमाडपंती" ही विशिष्ठ मंदिर वास्तुरचनाशैली निर्माण झाली. यादव काळातील एका हेमाडपंत नामक मंत्र्याच्या  नावाशी ही शैली जोडली गेलेली दिसते. आणि साधारण तेरा ते सतराव्या शतकात महाराष्ट्रात यादव - मंदिर शिल्पशैली तग धरून होती . त्यानंतर अठराव्या शतकात पुन्हा नवीन मंदिरे निर्माण होण्यास सुरुवात झाली.  या मंदिराची स्थापना १६२६-१६३९ च्या दरम्यान राजमाता जिजाऊच्या आज्ञेनुसार झाली असे सांगण्यात येते. या मंदिराचे पारंपारिक पद्धतीचे सभामंडप , गर्भगृह आणि गोपूर पद्धतीचे शिखर, मंदिरासमोरची दीपमाळ ही वैशिष्ट्ये मराठा राजवटीचा विशेष ठसा प्रकर्षाने जाणवून देतात.
Kasba Ganpati- Under Makeover-Feb2013-Photography by Ketki Itraj

Kasba Ganpati- Under Makeover-Feb2013-Photography by Ketki Itraj

      मंदिराच्या स्थापनेबाबत काही प्रचलित दंतकथा आहेत. असे म्हणतात की , त्यावेळी शिवबांच्या जन्मानंतर जिजाऊ शिवबांना घेऊन पुनवडीस आल्या होत्या तेव्हाची ही हकीगत . तात्कालीन मोघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली चालणारी दडपशाही , हिंदूंच्या मनातील खदखदणारा सामाजिक , सौस्कृतिक आणि धार्मिक कल्लोळ अत्यंत खेदजनक होता. त्या वेळी अनेक हिंदू ;  मुसलमान राज्यकर्त्यांच्या जाचाला कंटाळून आपापले मुलुख सोडून पुनवडीस ( म्हणजे आताच्या पुण्यात ) येत होते. जिजाऊ आणि शिवबांच्या तेथील वास्तव्याची बातमी ऐकून त्यांच्या छत्रछायेखाली आलेले हे हिंदू कसब्यात राहू लागले. त्यातच विजापूर जिल्ह्यातील ईंडी तालुक्यातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांपैकी एक म्हणजे विनायकभट्ट ठकार. विनायक भट्ट ठकार पुण्याला आले ; तेव्हा चतुर्श्रुंगी जवळ पार्वती नंदनच्या देवळात अनुष्ठानाला बसले. तेव्हा " शमीखाली मी आहे " असा दृष्टांत त्यांना झाला. तेथे त्यांना शोधले असता श्री गणेशाची तांब्याच्या आकाराएवढी मूर्ती त्यांना सापडली. त्यांनी मनोभावे त्या मूर्तीची पूजाअर्चा सुरु केली. जिजाऊन्ना ही बातमी कळताच त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या देखरेखीखाली लाल महालानजीकच श्रींच्या मूर्तीसाठी  देऊळ बांधून त्याची प्रतिष्ठापना करविली. आणखी एका दंतकथेप्रमाणे पूर्वी या देऊळाजवळ ओढा होता. तेथे शमीच्या झाडाखाली बसलेल्या गुराख्याला याच शमीखाली श्रींची मूर्ती असल्याचा दृष्टांत झाला. आणि त्यानंतर दादोजी कोंडदेवांच्या देखरेखीखाली राजमाता जिजाऊच्या आज्ञेनुसार या मंदिराची स्थापना झाली. येथे शिवाजीराजे , त्यानंतर पेशवे देखील श्रींच्या दर्शनासाठी नेमाने येत .जिजाऊनी बांधलेले हे देऊळ तेव्हाच्या सामाजिक अस्वस्थ्यावर चोख उत्तर ठरलेच ; तद्नंतर आजतागायत लोकमान्य टिळकांपर्यंत सार्यांच्याचसाठी ते स्फूर्तीस्थान झाले. शिवबांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला या "श्री मोरयाच्या " कृपेने आशीर्वाद आणि झंजावाती यश मिळाले ; तेव्हापासून या गजाननाला " जयति ( जय देणारा ) गजानन " म्हणूनही ओळखले जाऊ लागले. टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशउत्सव सुरु केला ; तेव्हा कसबा गणपतीला विसर्जन सोहोळ्याचा पहिला गणपती म्हणून मान मिळाला. तेव्हापासून " मानाचे पहिले गणपती "  म्हणूनही कसबा गणपती ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून आजवर कसबा_ विसार्जानाशिवाय पुण्याची  गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक सुरु होत नाही. कसबा गणपती आजही पुण्याचे ग्रामदैवत आहेत , पुण्याचे रक्षणकर्ते आहेत ही सार्या पुणेकरांची अचाट श्रद्धा ! कित्येक शतकांपासून आजही घरात लग्न असो वा मुंज ; कोणत्याही मंगल कार्याची पहिली अक्षद जाते ती कसबा गणपतीला.               

      कसब्यातल्या फणी आळीतील ( पूर्वी येथे हस्तिदंती फण्यांची दुकाने होती ) मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. पेठेतील वाड्यांप्रमाणे असणारे भव्य असे प्रवेशद्वार , दुमजली माड्या , सोपे , अगदी पारंपारिक दगड-विटांचे बांधकाम , लाकडी चौकटी , खांब मंदिरात प्रवेश करताक्षणी अस्सल पुण्याचा "फील"  देऊन जातात. दगड-विटांच्या पूर्वीच्या पद्धतीच्या बांधकामामुळे मंदिरात आल्यानंतर अत्यंत शांत , गार आणि पवित्र वाटते. येथे चपला काढल्यानंतर पाय धुवूनच मंदिरात जावे यासाठी प्रवेशद्वारापाशी सोय आहे. मूळ मंदिराच्या दगडी गाभार्याला पेशव्यांच्या काळात अत्यंत कोरीव लाकूड काम असेलेल्या छत आणि सभामंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे. हा मुळचा दगडी गाभारा जिजाऊनी बांधून दिलेला आजही जसाच्या तसा आहे. या मंदिराला दोन गाभारे आहेत. असे म्हणतात , की शिवबा औरंगजेबाच्या कैदेत असताना सचिंत जिजाऊन्ना विनायक भट्ट ठकारांनी महाराजांच्या परतीचा अचूक मुहूर्त सांगितला. तेव्हा जिजाऊन्नी खूष होऊन विनायक भट्ट यांच्या इच्छेनुसार मंदिराच्या मूळ गाभार्याबाहेर आणखी एक गाभारा बांधून दिला. पहिल्या गाभाऱ्याची मंडपी चांदीची असून शके १८३१ मध्ये बांधलेली आहे. बाहेरच्या गाभाऱ्याची मंडपी शके १८४८ मध्ये श्री. केंजळे यांनी बांधली आहे. त्या वेळी केंजळे यांनी नव्या पुलाचे कंत्राट घेतले होते. पूल बांधताना अखंड पाऊस पडत होता. अखेरीस , श्री मोरयांना नवस बोलल्यानंतर त्यांचे काम पूर्ण झाले त्यावेळी त्यांनी ही चांदीची मंडपी बांधली. मुख्य प्रवेशद्वारात चांदीची महिरप असून देवालयाच्या दोन्ही बाजूस गरुड-हनुमंत आणि जय-विजय आहेत. या चार मूर्तींचे चित्र श्री . बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांनी काढलेले आहे. बाहेर सभामंडप आहे. दोन्ही बाजूस सुरूचे पाच खांब आहेत. सरदार दीक्षितांनी हा सभामंडप बांधला. 
      गाभार्यामध्ये पाच फुट उंचीचा  " तांदळा " आहे. श्रींची मूळ स्वरूपातील मूर्ती कित्येक पिढ्यान-पिढ्यात कोणी बघितलेली नाही. सतत शेंदूर  चढविल्याने त्या लेपानात ही मूळ मूर्ती लुप्त झालेली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख आहे.या मूर्तीला आकार असा नाही. ही मूर्ती स्वयंभू मानली जाते. या मंदिराचे पुजारी आजही विनायक भट्ट ठकारांचे वौशजच आहेत. मूळच्या  गणेश मूर्तीला हिर्याचे डोळे असून नाभीस्थानी माणिक बसविल्याचे यांच्या पिढ्यानपिढ्यांकडून ऐकिवात आहे. या गणेश मूर्तीखाली जिवंत झरा आहे. म्हणूनच आतल्या गाभार्यात नेहमीच थंडगार वाटते. श्रींची देवाची  उपकरणे , दागिने , प्रभावळ , गंध , मुकुट आणि चंद्रही चांदीचा आहे. देवापुढे रात्रंदिवस अखंड नंदादीप तेवतो. दोन्ही बाजूला पुरुषभर पितळी समया सतत तेवत असतात. मंदिराच्या आतल्या बाजूला गाभार्याच्या डावीकडे शिवलींग, नंदी , दत्त, अंबाबाई आणि विठ्ठल रखुमाईच्या देखील मूर्ती आहेत. या मूर्तींना येणारे जाणारे भाविक श्रद्धापूर्वक प्रसाद , पेढे , शंकराला दुध , मारुतीला तेल , फुले , गंध , तीर्थ , हळदकुंकू , बुक्का असे काय-काय वाहत असतात. यांमुळे होणार्या रासायनिक प्रक्रियेमुळे , किवा फुले आणि इतर निर्माल्य कुजल्यामुळे मूर्तींची विटम्बना , अती झीज झाल्याचे दिसते. परमेश्वराप्रती असणारी भक्ती , प्रचंड प्रेम , परमेश्वराप्रती असणारा विश्वास हा प्रत्येकाच्या अतः करणात भरलेला असतो. प्रत्येक लहान मोठ्या सजीवातली सचेतना हा परमेश्वरी औशच ! तरीही शांत गाभार्यात , प्रसन्न अतः करणाने अंतरीच्या आत्याम्याचे आणि समोरील ब्रह्माचे एकरूप न बघता ; पाषाणरूपी सगुण मूर्तीस स्पर्श करण्यासाठीच का देवळात जावे ! परमेश्वराला मनापासून साद घालण्याऐवजी उद्याचे निर्माल्य त्याच्या मूर्तीस अर्पण करण्यास का धडपडावे ! गणरायांच्या मस्तकीच दुर्वा वहिल्या जाव्यात, सोवळे सांभाळले जावे किवा अगदी श्रींच्या मूर्तीवर अक्षद फेकून मारू नये याचीतरी किमान काळजी प्रत्येकाने घ्यायला हरकत नाही. ज्या परमेश्वरी आशीर्वादाने आपण हायफाय ऑफिसात काम करावे आणि लगझुरिअस घरात पेस्ट कंट्रोल करून चकचकीत रहावे ; त्याच परमेश्वराला चिकट , मेणचट अवस्थेत किडे मुंग्या झुरळांच्या तावडीत सोडून द्यावे ही कलियुगातल्या भक्ताची शोकांतिकाच ! मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील मारुतीच्या मनातही " रामराया ; कल्याण कर " हा धावा चालू असावा ! असो ! भाविकांसाठी मात्र नुकतेच प्रदक्षिणा मार्गावर दगडी फरशा घालून प्रदक्षिणा मार्ग सोयीचा आणि नीटनेटका केला आहे. प्रदक्षिणा मार्गावर देवाच्या दारी भाविकांना काही घटका बसता यावे याचीही मुळच्या बांधकामातच सोय आहे. 
      मंदिराच्या वास्तूचा पुढचा दर्शनी भाग तीन मजली असून , तिसर्या मजल्यावर नगारखाना आहे. उत्सवाच्या वेळी येथे चौघडा वाजविला जातो . फार पूर्वी प्रसिद्ध सनई वादक गायकवाड सनई वाजवत. त्यांचेच वारस आजही दर चतुर्थीला रात्री सनई वाजवतात. या मंदिराच्या माड्या आजघडीला उपयोगात नाही. पूर्वी मात्र तेथे मोठ्या प्रमाणावर श्रावणी होत, दोन्ही माड्या गर्दीने फुलून येत असे अजूनही ऐकावयास मिळते.
      देऊळ रोज पहाटे ६ वाजता दर्शनासाठी खुले होते. नियमित पंचोपचार / षोडशोपचारे पूजन , दुपारची आरती , नैवेद्य आणि रात्रीची धूपारती हा इथला नित्यक्रम. पहाटे देऊळ दर्शनासाठी उघडण्याआधी  देवळाचे पुजारी भूपाळी म्हणून देवाला शेजघरातून उठवितात. इतर सोपस्कार - पूजा सारे उरकून गणपतीच्या पूजेसाठी  देवाला घातलेले पाणी तीर्थ म्हणून भाविकांना दिले जाते. मंदिरात भाविकांनी देवाला अर्पण केलेले पेढे , साखरफुटाणे वगरेंचा प्रसाद भाविकांना रोजच्या रोज वाटला जातो. दुपारी १२-१२ ३० च्या दरम्यान श्रींची आरती होऊन नैवेद्य दाखविला जातो. रोजच्या नैवेद्य म्हणजे पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे संपूर्ण जेवणाचे ताट आणि एखादा गोड पदार्थ.गणेश चतुर्थीला पंचपक्वान्नाचे नैवेद्य दाखविण्यात येतात. चतुर्थी च्या नैवेद्यात संध्याकाळी मोदक आवर्जून असतात. आरती नंतर देऊळ दुपारी १२-४ या वेळात दर्शनासाठी बंद असते. मंदिर बंद असताना स्वतः पुजारी गाभार्याचीच नव्हे तर मंदिराची स्वच्छता करतात. एक झाडूवाली बाई, अपुरे मनुष्यबळ आणि भाविकांच्या प्रेमळ (अंध ? ) श्रद्धेच्या सपुष्प भेटी यांमुळे मंदिराची स्वच्छता आणि गाभार्यातील पावित्र्य या दोहोंना सांभाळताना पुजार्यांची तारेवरची कसरत नाही झाली तर नवलच ! तरीही मूर्ती जवळील भाग सोडता देवळात स्वच्छता कसोशीने ठेवण्यात येते. सायंकाळी ४ नंतर रात्री शेजारती होईपर्यंत म्हणजे साधारण १० वाजेपर्यंत देऊळ दर्शनासाठी उघडे असते.
        देवळात बाराही महिने सकाळ- संध्याकाळ कीर्तन- पुराण चालते. पुराणिक - कीर्तनकार विनामूल्य कीर्तने- प्रवचने करतात. पौषात शुद्ध ४ पर्यंत गणेशपुराण वाचन आणि रोज आरती चालते. मंदिरात विशेष थाटात साजरे होणारे उत्सव म्हणजे माघी, जेष्ठी आणि भाद्रपदी असे ३ उत्सव शुद्ध १ ते ५ या तिथी. या तीनही उत्सवांचे खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या लाडक्या गणरायाची या तीनही उत्सवांचे वेळी दृष्ट काढण्यात येते ! आणि हा मान केवळ पुजार्यांच्या अर्धांगीनिचाच ! या उत्सवाचे प्रसंगी किवा दिवाळी, संक्रांत , रंगपंचमी सारख्या सणवाराला गणेशाला विविध पोशाखांनी आणि अलंकारांनी सजविण्यात येते.भाद्रपदातील उत्सवाची परंपरा देखील पेशव्यांपासूनची.  गजानन हे पेशव्यांचे  उपास्य दैवत . त्यांच्याकडे भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी असा उत्सव असे. असाच उत्सव इतर सरदारांकडेही असे. आजही सरदार मुजुमदार यांचेकडे ही प्रथा दिसते. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मोऱ्यांच्या देवालयात गजाननाची पूजा होते. रात्री आरती होते. पंचमीला आरती नंतर खोबर्याची वाटी देण्यात येते. लळित होऊन उत्सव संपतो. विसर्जनाचे वेळी मंदिरालगत बसविण्यात येणाऱ्या कसबा गणपती सार्वजनिक गणपती मंडळाच्या मूर्तीला विसर्जनाचा पहिला मान मिळतो.या व्यतिरिक्त वर्षातून एकदा चिंचवडच्या मोरया गोसावींची पालखी येथे येते. डिसेंबर महिन्यात २१ आरत्यांच्या विशेष कार्यक्रम देवळात असतो. या देवळातील पूजा- उत्सव हे सारे पुजार्यानतर्फे केले जाते. आता मंदिराचा ट्रस्ट आहे. हे सार्वजनिक देवस्थान आहे. मात्र याला सरकारी मदत काहीही नाही. पार्वती देवस्थाना कडून भाद्रपदातील ५ दिवसांचा उत्सव त्यांची माणसे येउन पार पडतात. पूर्वी भाद्रपदातील उत्सवासाठी पेशव्यांकडून मदत मिळत. शिवाजींच्या काळात नंदादिपासाठी मावळातून तेल येत. या संबंधीचे मुळचे पत्र ( शिवरायांची राजमुद्रा असणारे ) ठकारांकडे असणार्या दस्तावेजात अजूनही आहे. सध्या नित्य नैमित्तिक खर्च देवापुढे येणाऱ्या उत्पन्नातून आणि भक्तांच्या स्वेच्छा देणग्यांतूनच केला जातो. सार्वजनिक कसबा गणपती मंडळ त्यांच्या वतीने वर्षभरात आरोग्य शिबिरे , महिला दिन यांसारखे कार्यक्रम घेत असतात.
      सध्या या देवळाचे डागडूजीचे काम चालू आहे. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत पुणे महानगर पालिकेकडून मिळालेल्या निधीवरच हे काम चालू आहे. मूळ वास्तूला धक्का न लावता पारंपारिक वास्तुशैलीचे जतन करीत मूळ मंदिराला मजबुती आणि भक्कमपणा यावा या अनुशंघाने प्रयत्न चालू आहेत. म्हणजे शनिवार वाडा / विश्राम बाग वाड्याच्या नुतानीकरणासारखेच. अत्यंत दोलायमान झालेले लाकडी काम शक्य तेथे दुरुस्त अथवा बदली करण्यात येत आहे. यात जुने लाकडी खांब , मंदिराचा नगारखाना , शिखराची मजबुती , देवळात पिण्याच्या पाण्याची सोय आदी गोष्टींवर काम चालू आहे.
     या जयती गजाननाच्या मूळ मूर्तीची आस मनातून काही जात नाही. श्रींचे तिथले अधिष्ठान नकळतच पाऊले तिकडे खेचून घेते. ते शिवबांचे  होते , ते आमचेही आहेत. बाहेरगावच्यांनी पुण्याचे ग्रामदैवत म्हणून किवा पुणेकरांनी अगदी नोकरीचा पहिला दिवस म्हणून ज्यांच्याकडे हक्काने जावे असे हे कसबा गणपती आजही व्यावहारिकपणाचा लवलेशही नसलेल्या कसब्यात विघ्नहरता म्हणून समर्थ आहेत.

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

BRITISH - Hi Tea हाय टी " हाय टी " म्हणजे नक्की आहे तरी काय ? चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे ? की ...

Listed on: link directory